दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
दौंड शहरातील प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ही दुःखद घटना घडल्याने संपूर्ण बाजारपेठेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील शिवाजी चौकातील प्रकाश क्लॉथ साडी सेंटर दुकानाचे मालक श्याम प्रताप राय लुंड(वय 57,रा.दौंड) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
आज दि.10 रोजी दु.1वा. दरम्यान गोपाळवाडी हद्दीतील शेतातील विहिरीत त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. मयताचे भाऊ दुकानात असताना त्यांना त्यांच्या कामगाराचा फोन आला की गोपाळवाडी येथील विहिरीत मालक श्याम लुंड यांचा मृतदेह पाण्यात तरंगत आहे. त्यामुळे घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदरची घटना उघडकीस आली.
श्याम हे घरातून दाढी ,कटिंग करून येतो असे सांगून घराबाहेर गेले होते. श्याम यांनी कोणत्यातरी तणावाखाली आत्महत्या केली आहे, ते मागील दीड महिन्यापासून आजारी होते अशी माहिती मयताचे चुलत भाऊ हरेश लुंड यांनी पोलिसांना दिली असल्याची माहिती ठाणे अंमलदार संतोष शिंदे यांनी दिली. घटनेचा पुढील तपास पो.हवा. पांडुरंग थोरात करीत आहेत.