दौंडमध्ये रस्ता सुरक्षा अभियान संपन्न, दौंड मधील बंद करण्यात आलेला RTO कॅम्प पुन्हा सुरू



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

पुणे जिल्ह्यामध्ये सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान सध्या सुरू आहे, त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या( बारामती विभाग) वतीने व दौंड शहरातील RTO एजंट सुनील काळे, सलीम शेख, अमजद सय्यद व सुनील भापकर यांच्या पुढाकाराने दौंड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या पटांगणामध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. यावेळी टी व्ही एस शोरूमचे मालक सागर मगर, MIM पक्षाचे शहराध्यक्ष मतीन शेख यावेळी उपस्थित होते. 

रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने बारामतीचे मोटार वाहन निरीक्षक प्रकाश खटावकर यांनी दौंड करांना सुरक्षित वाहन चालविण्या विषयी तसेच वाहतूक विभागाचे नियम व कायद्यांबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. वाहन चालविताना चालकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावर वाहनांना आडवी येणारी मोकाट जनावरे… अशा प्रकारांमुळे अनेकदा अपघात होत असतात त्यामुळे वाहन चालविताना चालकांनी नेमकी कोणती जबाबदारी घ्यावी व कायद्यांचे पालन करीत सुरक्षित वाहन कसे चालवावे याबाबत खटावकर यांनी दौंड करांना चांगले मार्गदर्शन केले.  

आई-वडिलांचे जीव की प्राण आहात तुम्ही, त्यांच्या साठी तरी सुरक्षित या घरी… हेल्मेट तुमच्यासाठी पण, कुटुंबासाठी पण….

सीट बेल्ट जणू प्रियजनांच्या प्रेमाची पकड… दारूची नशा करी आयुष्याची दुर्दशा असा आशय असलेला सुरक्षा अभियानातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. 

उप प्रादेशिक परिवहन विभागाला कॅम्प घेण्यासाठी शहरात स्वतःची व हक्काची जागाच नसल्याने दौंड मध्ये मागील वर्ष भरा पासून RTO कॅम्प बंद करण्यात आलेला होता. त्यामुळे वाहना संबंधीच्या कोणत्याही छोट्या मोठ्या  कारणासाठी,  नवीन वाहन नोंदणीसाठी, वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी बारामती कार्यालयांमध्ये जावे लागत होते. दौंडकरांची ही  अडचण लक्षात घेऊन येथे  काम करणाऱ्या एजंट्स लोकांनी स्वतः  पुढाकार घेत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची  जागा मिळविली व उपप्रादेशिक परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करीत दौंडमध्ये RTO कॅम्प पुन्हा सुरू केला आहे. 

आठवड्याच्या दर शुक्रवारी आता येथे कॅम्प भरणार आहे ज्यामुळे दौंडकरांची वाहना संबंधीची कामे आता दौंडमध्येच मार्गी लागणार आहेत.