राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक ‘डॉ.मोहन भागवत’ उद्या ‘सांगली’ दौऱ्यावर

सुधीर गोखले

सांगली : सांगली येथील टिळक चौकात असणाऱ्या लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्षांचा प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये उद्या (रविवार दि १७ डिसेंबर) होत आहे.

सुरक्षेच्या करणास्तव हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असेल असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर सांगली-मिरज रस्त्यावर असणाऱ्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामण महाविद्यालयाच्या मोठ्या मैदानावर डॉ. भागवतांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी जिल्ह्यातून हजारो स्वयंसेवक उपस्थित राहणार असून सरसंघचालक त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

तत्पूर्वी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सरसंघचालकांचे टिळक स्मारक मंदिरात आगमन होईल. प्रथम येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. दीप प्रज्वलन झाल्यावर ‘शताब्दी’ बोधचिन्हाचे अनावर त्यांच्या हस्ते होईल. डॉ भागवत यांच्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त असल्याने या कार्यक्रमामध्ये निमंत्रित व्यक्तींनाच प्रवेश असल्याचे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी सहकरनामा शी बोलताना सांगितले. तर चिंतामण महाविद्यालयाच्या मैदानात होणाऱ्या व्याख्यानात सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो स्वयंसेवक संघ कार्यकर्ते तसेच अनेक भाजप नेते सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले.

सांगलीत चोख पोलीस बंदोबस्त
डॉ. मोहन भागवतांच्या दौऱ्यामुळे सांगलीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सांगली-मिरज रस्त्यावरील फेरीवाले आणि किरकोळ विक्रेत्यांना येथे मनाई करण्यात आली आहे. महापालिकेने रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे. स्वतः आयुक्त सुनील पवार हे या कामावर लक्ष ठेऊन आहेत.