शिरूर – चोरट्यांची नवीन शक्कल… ओ साहेब तुमचे पैसे खाली पडले! अण, काही सेकंदात गाडीला अडकवलेले ‛दीड लाख’ गायब

शिरूर : चोरट्यांनी सध्या चोरीचे नवनवीन फंडे आत्मसात केल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पहा ना, शिरुर येथील एका व्यक्तीचे 1 लाख 50 हजार रुपये ठेवलेली पिशवी चोरट्यांनी त्या व्यक्तीला आवाज देण्याची नवीन शक्कल लढवून चोरी केली आहे.

तर घडले असे की अशोक श्रीपतराव बेंद्रे (रा.आंबळे, शिरूर) हे सकाळी 11 वाजता शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये गेले आणि त्यांनी बँकेतून 1 लाख 50 हजार रुपये काढून ते प्लास्टिक पिशवीमध्ये घालून त्यांच्या मोटार सायकलला असणाऱ्या हँडलच्या दुसऱ्या पिशवीमध्ये टाकले. आणि मोटार सायकलचे हॅन्डल लॉक खोलत असताना दोन अनोळखी ईसम त्यांच्या पाठीमागे येऊन एकामेकांशी बोलत उभे राहीले. तर तिसरा एक इसम तेथे आला आणि त्याने आवाज देवुन व साहेब “तूमचे पैसे गाडीचे पाठीमागे पडले आहे” असे म्हणाला त्यामुळे बेंद्रे यांनी गाडीच्या पाठीमागे वळून पाहिले तर तेथे काहीच पडलेले दिसले नाही. त्यामुळे त्यांनी गाडीला असणारी पैशाची पिशवी पाहिली असता तेथे त्यांना ती दिसली नाही. त्यामुळे आपल्याला फसवून तीन अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपयांची पैशांची बॅग चोरून घेऊन गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

चोरट्यांनी चोरीचे नवनवीन फंडे शोधून काढले असून लोकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.