दौंड मध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून आर.पी.आय. पक्षाचे आंदोलन, वादग्रस्त भोंगा प्रकरणात पक्ष मुस्लिम बांधवांच्या पाठीशी

दौंड : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशावरून, वादग्रस्त ठरलेले मनसे पक्षाचे भोंगा व हनुमान चालीसा प्रकरणा विरोधात तसेच पक्षाच्या विविध मागण्यांसाठी दौंड मध्ये आरपीआय (आठवले गट) पक्षाने आंदोलन केले. संपूर्ण देश व राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी सारखे विषय सोडून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे विषय काढून कायदा-सुव्यवस्था बिघडविणार्या राज ठाकरे व त्यांच्या मनसे पक्षाचा यावेळी निषेध करण्यात आला.पक्ष्याच्या वतीने प्रशासनाला या वेळी निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार प्रविणा बोर्डे यांनी निवेदन स्वीकारले. पक्षाचे पदाधिकारी रवींद्र कांबळे, विकास कदम,प्रकाश भालेराव, सतीश थोरात तसेच कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते. नागसेन धेंडे, भारत सरोदे, इंद्रजीत जगदाळे, नरेश डाळिंबे व विकास कदम यांनी आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला व आम्ही देशातील तमाम मुस्लिम बांधवांच्या पाठीशी आहोत असा ठाम विश्वास व्यक्त केला.
महार वतन इनाम वर्ग 6 ब व इतर नवीन शर्तीच्या जमिनी चे झालेले बेकायदेशीर व्यवहार रद्द करून जुन्या शर्तीचे झालेले आदेशांची चौकशी करण्यात यावी, दौंड रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांची घरे पाडू नयेत, भूमीहिनांना 3 एकर बागायत किंवा सहा एकर जिरायत जमिनींचे वाटप करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.