रोड रोमिओ, रिक्षाचालक पोलिसांच्या रडारवर! पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा कडक कारवाईचा इशारा

दौंड : शहरात मुली व महिलांना छेडछाड करणारे रोड रोमिओ, पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणारे बेशिस्त रिक्षा चालक तसेच आपल्या अल्पवयीन मुलांच्या ताब्यात दुचाकी देणारे पालक अशांवर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे.पो. नि.घुगे यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह शहरातील हुतात्मा चौक, गांधी चौक, नेहरू चौक, गोल राऊंड,गोपाळवाडी रोड परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत या परिसरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर तसेच विना नंबर प्लेट ची वाहने वापरणाऱ्या, दुचाकीवर ट्रिपल सीट बसून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. शहरातील रिक्षाचालकाने व्यवसाय करताना वाहतुकीचे नियम पाळावेत, निश्चित केलेला गणवेष परिधान करावा तसेच गणवेषावर प्रशासनाने दिलेला बॅच असावा अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार पणे करण्यात आल्या आहेत तरीसुद्धा काही रिक्षाचालक या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे यापुढे कोणाचीही गय न करता बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची सूचना रिक्षाचालकांना पुन्हा देण्यात आली आहे.
शहरातील नाका-बंदी दरम्यान अल्पवयीन मुले सर्रासपणे दुचाकी दामटत असल्याचे दिसून आले आहे, अशा मुलांच्या पालकांवर आता कारवाई होणार आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी, शाळा -कॉलेज असलेल्या परिसरामध्ये विनाकारण थांबून मुलींची, महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंवर तर अतिशय कडक कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सांगितले.