‘मळद’ दरोडा प्रकरणातील आरोपी जेरबंद, 5 दिवसांची पोलीस कोठडी

दौंड

मळद ता. दौंड येथील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेला दरोड्यातील आरोपी जेरबंद
दिनांक १८/०५/२०२२ रोजी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मळद ता.दौंड येथील दरोड्यातील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद केला असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.नारायण पवार यांनी दिली आहे.

दिनांक २९/०८/२०२० रोजी रात्रौ ०८.०० वा चे सुमारास फिर्यादी नामे सागर दत्तात्रय महाजन राहणार सोरतापवाडी ता.हवेली जि. पुणे यांनी तक्रार दिली होती की मौजे मळद गावचे हद्दीत पुणे सोलापूर हायवे रोडवर रेल्वे उड्डाण पुलाजवळ वृंदावन हॉटेलच्या विरूद्ध बाजूस फिर्यादी हे त्यांचा टेम्पो नं एम. एच १२ एफ सी ७७१९ हा सोलापूर बाजूकडे घेऊन जात असताना पाठीमागून दोन मोटार सायकलवर चार अनोळखी इसम मागून आले व त्यापैकी एका पल्सर मोटारसायकल वरील इसमाने फिर्यादी यांना आवाज देऊन गाडी बाजूला घेण्यास सांगीतले तेव्हा फिर्यादी गाडी रोडचे बाजुला घेत असताना त्याने त्याची मोटारसायकल फिर्यादी यांचे टेम्पोच्या समोर आणून पल्सर वरील दोन इसम व पुढे थांबलेल्या मोटार सायकल वरील एक इसम याने टेम्पो जवळ येऊन टेम्पोचा दरवाजा उघडून चालू टेम्पोची चावी काढून घेऊन फिर्यादी यांना खाली घेऊन एक इसम टेम्पोत चढला व ड्रायव्हर सीटवर बसला तसेच इतर दोन लोकांनी फिर्यादी यांना ओढत टेम्पो समोरं नेऊन उभे केले त्या दोघांनी फिर्यादीस हाताने मारहाण करून त्यांनी रोडच्या कडेला असणारे खड्ड्यात ढकलून दिले व फिर्यादी यांचे गाडीत ठेवलेली पैशांची बॅग घेऊन एक जण पल्सर मोटार सायकलवर बसला व त्या दोन्ही मोटारसायकल व चार इसम सोलापूर बाजूकडे वेगात निघून जाऊ लागले तेव्हा फिर्यादी यांनी मोटार सायकलवर मागे बसलेल्या एक जणांचे शर्टची कॉलर पकडली व दुसऱ्या हाताने शीटचे कढी पकडली त्यावेळी त्यांनी मोटारसायकल जोरात पळवत नेऊन फिर्यादी यांना थोड्या अंतरावर फरफटत नेले तेव्हा त्यांचे उजव्या पायाच्या गुडघ्याला जखम झाली आहे सदरचे चारही चोरटे हे गाडीतील कापडी पिशवी मधील रोख रक्कम २९,७८,००० रु जबरीने चोरी करून घेऊन गेले होते सदर बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता .सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली होती.

सदरचा गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी नामे मंगेश ऊर्फ मयूर भगवान चव्हाण रा वाखारी केडगाव ता. दौंड जि. पुणे हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता.दिनांक १८/०५/२०२२ रोजी सदरचा आरोपी हा वाखारी केडगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाला मिळाल्याने सदर पोलीस पथक वेषांतर करून वाखारी येथे गेले असता आरोपी मंगेश चव्हाण यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला तेव्हा पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

सदरची कामगीरी पाेलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड श्री. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार पोसई संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम ,गुरुनाथ गायकवाड पोलीस नाईक अक्षय यादव,रामदास जगताप पोलीस शिपाई मारुती बाराते यांचे पथकाने केली आहे. सदर आरोपीस मा. जे एम एफ सी कोर्ट दौंड यांनी ०५ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली असून आणखीन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई शहाजी गोसावी दौंड पोलीस स्टेशन हे करीत आहेत .