बारामती : बारामती तालुक्यातील मोरगाव जवळ उसाचा ट्रॅक्टर आणि कार मध्ये झालेल्या अपघातात बारामतीमधील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. भंडारी आणि कळसकर कुटुंबातील तिघेजण पुण्यातील एका कार्यक्रमावरून परतत असताना हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये बारामतीचे प्रसिद्ध सराफ श्रेनिक भंडारी यांच्या पत्नी अश्विनी भंडारी, मुलगा मिलिंद भंडारी व बहीण कविता कळसकर यांचा मृत्यू झाला आहे. तर यात गंभीर जखमी झालेल्या बिंदिया भंडारी यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेजण पुण्यातील एका कार्यक्रमातून बारामतीला घरी परतत होते. त्यावेळी उसाचा ट्रॅक्टर आणि त्यांच्या कारमध्ये अपघात घडला. या अपघातामध्ये मिलिंद भंडारी हे गंभीर जखमी झाले होते मात्र ते लोकांशी बोलत होते. व त्यांनी याबाबत फोनवरून आपल्या कुटुंबियांना माहितीही दिली. मात्र अपघातामध्ये लागलेल्या वर्मी मारामुळे त्यांचाही नंतर यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.
रात्रीच्यावेळी दोन दोन ट्रॉली भरगच्च भरलेला ऊस घेऊन जाणाऱ्या उसाच्या ट्रॉली आणि ट्रॅक्टरमुळे अनेक ठिकाणी अपघात घडून कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ऊस करणाऱ्या वाहतूक ट्रॅक्टर्सना मागील बाजूस रिफ्लेक्टर लावले जात नाहीत, तसेच ट्रॅक्टरमधील टेपचा फुल आवाज करून ट्रॅक्टर चालक गाणी ऐकत चालत असतात त्यामुळे त्यांना नेमके कुठे, कोणते वाहन मागून किंवा पुढून पास होत आहे याचेही भान राहत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरने रात्रीची ऊस वाहतूक करण्यात येऊ नये आणि ट्रॅक्टर, ट्रॉलीला जर रिफ्लेक्टर नसेल तर त्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी तरच कुठेतरी या अपघातांचे प्रमाण घटणार आहे. नुकताच दौंड येथे अश्याच एका उसाच्या ट्रॅक्टरने एका पोलीसाचा बळी घेतल्याची घटना घडली होती.