दौंड : ‘पडवी’ जवळ स्कुलबसला अपघात, 7 वर्षीय विद्यार्थिनी जागीच ठार

दौंड : दौंड तालुक्यातील पडवी जवळ स्कूलबस आणि चारचाकी वाहनाचा अपघात झाला असून या अपघातामध्ये स्कूल बसमधील ७ वर्षांची विद्यार्थिनी जागीच ठार झाली आहे  तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे.

अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव अवनी गणेश ढसाळ (वय ७) असे असून यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव मरिन तांबोळी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने  पुणे येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी देताना सदर शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान सुपे (ता.बारामती) येथील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये हि स्कुलबस विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. यावेळी कुसेगाव-पडवी येथील अष्टविनायक महामार्गावर पडवी हद्दीत असणाऱ्या एका वळणावर एक चारचाकी कार वाहन आणि स्कुलबस यांचा भीषण अपघात घडला. या घटनेत वरील विद्यार्थिनी जबरी मार लागल्याने घटनास्थळीच मृत्यूमुखी पडली. तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली.

घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस समीर भालेराव व घनश्याम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना मदत केली तसेच अपघाती वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.