दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा चौक हा शालेय विध्यार्थी आणि केडगाव – केडगाव स्टेशन ये जा करणाऱ्या लोकांसाठी दिवसेंदिवस घातक होत चालला आहे.
कालच 9वी ची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल घेऊन जाणाऱ्या एका अवजड वाहनाची धडक बसली. यावेळी या विध्यार्थिनीची सायकल अवजड टेम्पो खाली येऊन तिचे नुकसान झाले तर त्या विध्यार्थिनीलाही दुखापत झाली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून ही विद्यार्थिनी या अपघातातून बालंबाल बचावली.
मात्र यातून आता स्थानिक नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून कृषी उत्पन्न बाजार समिती – बारवकर मळा पूल येथे असणाऱ्या चौकात या अगोदरही अनेकवेळा अपघात घडून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारी अवजड वाहने नेहमीच भरधाव वेगात असतात आणि ती बाजार समिती कमान आणि बारवकर मळा पूल जवळ असणाऱ्या चौकात वेग कमी न करता थेट पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या रस्त्याने केडगाव किंवा केडगाव स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांचा आणि त्यांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असते. या चौकात चारही बाजूने आता योग्य उंचीचे गती रोधक बसविण्याची मागणी येथील नागरिक करत असून जर येथे पुन्हा अपघात घडून एखाद्याच्या जीवाचे बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण?? असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.