अख्तर काझी
दौंड : दौंड – पाटस रोडवर पोद्दार शाळा परिसरामध्ये मालवाहतूक टेम्पो व इंपोर्टेड कार चा समोरासमोर भीषण अपघात घडला आहे. अपघातामध्ये मर्सिडीज कारचे मोठे नुकसान झाले परंतु सुदैवाने या घटनेमध्ये कार मधील एअर बॅग उघडल्याने यामध्ये जीवित हानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. अपघातग्रस्त कारमध्ये श्रीगोंदा मधील डॉक्टर व त्यांचे नातलग असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव यांनी दिली. तसेच अपघातानंतर जाधव यांनी स्वतःच्या गाडीमध्ये जखमींना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार रविवार दि.11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान मालवाहतुक टेम्पो दौंडहुन पुण्याच्या दिशेने निघाला होता. टेम्पो पोद्दार शाळेच्या समोरील रस्त्यावर आला असताना डॉक्टरांची कार पुण्याहून दौंड च्या दिशेने येत होती, त्या दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये अपघात झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दौंड पोलिसांना अपघाताची खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली, पोलीस घटनास्थळी आले तेव्हा दोन्ही वाहनांमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे अपघात कसा झाला व वाहनांमध्ये कोण कोण होते याची माहिती त्यांना स्थानिकांनी दिली.
टेम्पो चालक अपघातानंतर कोठे गेला याची माहितीही कोणाकडे नव्हती मात्र कार मधील जखमी उपचारासाठी शहरातील खाजगी दवाखान्यात गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली होती ती पोलिसांनी सुरळीत केली. या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस वारंवार अपघात होत आहेत प्रशासनाने यावर काहीतरी तोडगा काढावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.