मुंबई : राज्यातील काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी ओढे, नाले, नद्यांना पूर सदृश स्थिती निर्माण झाली असून रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रकारही घडत आहेत.
असाच एक प्रकार बुधवारी रात्री खालापूरजवळील असणाऱ्या इरसालवाडी (इरसाल गड) येथे घडला असून येथे माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पहायला मिळत आहे. या ठिकाणी दरड कोसळून 30 ते 35 घरे मलब्याखाली दबून या घरांमधील आत्तापर्यंत 13 जण मृत्यूमुखी पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून येथील मतदार संख्या ही 300 च्या आसपास असल्याची माहिती मिळत आहे. येथील मलब्याखाली 30 ते 40 घरातील लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत रायगड चे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथे जवळपास 60 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. येथे बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू असून अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. येथील मलब्याखाली अजूनही काही मृतदेह असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे येथील सुरू असलेल्या मदत कार्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे आणि महेश बालदी हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इरसाल वाडी (इरशाळगड) येथील दुर्देवी घटनेचा आढावा घेत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे.