अख्तर काझी
दौंड : नाभिक समाजाला आपला पारंपारिक व्यवसाय सोडून दुसरे कुठलेही उदरनिर्वाहाचे साधन नाही. कुटुंबाचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, बँकांचे कर्ज फेडणे या सर्व गोष्टी आमच्या नाभिक व्यवसायावरच अवलंबून आहे आणि अशी परिस्थिती असताना आमच्या व्यवसायामध्ये परप्रांतीय कारागिरांचा मोठ्या प्रमाणात शिरगाव झाला आहे आणि होतो आहे.
दौंड शहरात व्यवसायानिमित्त आलेल्या या परप्रांतीय लोकांचा परिणाम नाभिक समाजावर होऊ शकतो. त्यामुळे शहरातून या परप्रांतीय कारागिरांना हटविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ दौंड च्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे. नाभिक व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही दुकान मालकाला आमचा विरोध नसून परप्रांतीय कारागिराला आहे असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
परप्रांतीय कारागिरांकडून होणाऱ्या अन्यायापासून नाभिक समाजाला वाचवा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी, दौंड शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बंड, सुभाष जाधव, रुपेश बंड, दत्ता राऊत, उमेश गायकवाड, सुनील ताटे, निरंजन पंडित, गणेश रंधवे, संजय ताटे, सनी बंड ,चंद्रकांत बंड तसेच नाभिक समाज बहुसंख्येने उपस्थित होता.