| सहकारनामा |
पुणे :
रयत क्रांती संघटनेतर्फे कोरोना आणि इतर सर्व विषयावरती राज्य सरकारन अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन कानगाव ता.दौंड येथे असणाऱ्या स्मशानभूमी मध्ये राज्य शासनाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे, सामाजिक कार्यकर्ते तात्यासो मोरे, नामदेव फडके इत्यादी उपस्थित होते.
यावेळी रयत क्रांती चे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी बोलताना, कोरोनामुळे राज्यातील जनतेचे अतोनात हाल होत आहेत. रेमडेसीवीर इंजेक्शन नाही, बेड नाही, ऑक्सीजन नाही आणि स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी सुद्धा नंबर लावावे लागतात अशी दयनीय अवस्था आज राज्यातील जनतेवर या नाकर्ते सरकारमुळे आली असल्याचा आरोप केला आणि याचा निषेध म्हणून राज्यसरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले.
रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यभर अशा प्रकारची आंदोलने आज करण्यात आली आहेत. शासन फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यातच व्यस्त आहे व भ्रष्टाचार करण्यातच दंग आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कोरोना रुग्णालयातील सर्व प्रश्न तसेच लॉकडाउन केल्यामुळे ज्यांची हातावर पोट आहे त्यांना कोणतीही मदत नाही.
या सर्व गोंधळातील कारभारामुळे जनता भयभीत झाली असून जनतेला राज्यात कोणीच वाली राहिलेला नाही. कोरोना रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात तसेच वर्षभरापासून कोणतेही उत्पन्न नसल्यामुळे सर्वांचेच कर्जाचे हप्ते थकलेले आहेत. सदर कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे.
या गंभीर बाबीकडे सुद्धा राज्य शासनाचे लक्ष नाही. या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेतर्फे स्मशानभूमीत राज्यशासनाच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले असल्याचे यावेळी भानुदास शिंदे यांनी सांगितले.