‘दौंड’ ची रणरागिणी थेट ‘राहुल गांधी’ यांच्या ‘फेसबुक’ पेजवर

सहकारनामा

दौंड तालुक्यातील महिलांची बुलंद तोफ समजली जाणाऱ्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांचा फोटो खासदार राहुल गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आणि दौंड तालुक्यातील जनतेची मान गर्वाने ताठ झाली.

वैशाली नागवडे ह्या आपल्या निर्भीड आणि कुशल वक्तृत्वामुळे सर्वत्र परिचित आहेत. त्या कट्टर पवार समर्थक म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी गेल्या 25 वर्षांपासून कट्टर पवार समर्थक राहून दौंड तालुक्यात आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. निर्भीड वक्तव्य, योग्य पाठपुरावा आणि सामाजिक कार्यात झोकून देण्याची त्यांची शैली ही त्यांना महानंद चे अध्यक्षपद मिळूनही त्यांनी कमी केली नाही. याच निर्भीड रणरागिणीने काल खासदार राहुल गांधी यांची भेट घेत महिलांवर होणारे अत्याचार आणि सर्वसामान्य लोकांची महागाईमुळे होत असलेली फरफट आणि व्यथा त्यांच्यासमोर मांडली आहे.

खा.राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करताना वैशालीताई नागवडे

अशी आहे भारत जोडो यात्रा..

गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून ‘भारत जोडो’ (bharat jodo yatra) ही कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा सुरु झाली आहे. दररोज किमान 25 किमी पायी चालून लोकांमध्ये स्फूर्ती जागविण्याचे काम खा.राहुल गांधी करत आहेत. या यात्रेला आता लोकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे.

ही यात्रा सध्या महाराष्ट्र राज्यातून जात असून जागोजागी त्यांचे स्वागत होत आहे. विविध जिल्हे आणि तालुक्यातून यात अनेकजण आपला सहभाग नोंदवत आहेत. खा.राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचणे वाटते तितके सोपे काम नाही. कारण लाखो लोकांचा जमाव आणि त्यात त्यांची असलेली सुरक्षा इथपर्यंत सामान्य माणूस कसा पोहोचेल असा अनेकांना प्रश्न पडतो, मात्र खा.राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वसामान्य नागरीक सहज पोहोचत आहे. त्याला त्यांच्यासोबत फोटो काढले दिले जात आहेत. सुराक्षेची कोणतीही परवा न करता खा.राहुल गांधी हे आवर्जून सर्व लोकांना भेटून त्यांना सोबत घेऊन पुढे चालत आहेत हे या यात्रेचे वैशिष्टय मानावे लागेल.