तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा |  आंबेगाव पुनर्वसन येथे माजी आमदार रमेश थोरात यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सुर

अब्बास शेख

दौंड : विधानसभा निवडणुकीच्या हालचालिंना वेग आला आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार आपल्या तालुक्यात ठाण मांडून बसले आहेत. वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळी परिस्थिती पहायला मिळत आहे. महायु्तीकडून दौंड तालुक्यात विद्यमान आमदार राहूल कुल तर इंदापूर तालुक्यात दत्तमामा भरणे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांचे प्रतिस्पर्धी त्यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.  दौंड चे विद्यमान आमदार राहुल कुल यांना माजी आमदार रमेश थोरात हे आव्हान देण्याच्या तयारीत असून इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे विद्यमान आमदार दत्तामामा भरणे यांना आव्हान उभे करणार अशी परिस्थिती पहायला मिळत आहे.

दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन येथे आज सकाळी १०:३० वाजता माजी आमदार रमेश थोरात यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांना कार्यकर्त्यांकडून  करण्यात आला मात्र जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षकाडून उमेदवारी नाकारली गेली तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी असा आग्रहही उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी बोलताना, तुमच्या सर्वांच्या भावना जेष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवू आणि माझ्यामागे असणारी दौंड तालुक्यातील जनता, कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या पद्धतीने पुढे जाऊ असे त्यांनी यावेळी सांगितले.