माजी आमदार रमेश थोरात यांचा आज सायंकाळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

अब्बास शेख

दौंड : दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. वरवंड येथे आज रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून त्यांच्यासोबत त्यांना मानणारे असंख्य कार्यकर्तेही यावेळी उपस्थित राहून पक्ष प्रवेश करणार असल्याची आयोजकांकडून देण्यात आली आहे.

अखेर ती चर्चा खरी ठरली – मागील काही महिन्यांपासून दौंड चे माजी आमदार रमेश थोरात हे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा रंगत होत्या. त्यातच रमेश थोरात यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत सोबत गाडीमध्ये फिरतानाचे व्हिडीओ कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने थोरतांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आज त्या चर्चा सत्यात उतरत असून आज एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात यांचा दौंड तालुक्यातील वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.

लोकसभेला सुनेत्रा पवारांचा प्रचार, विधानसभेला मात्र तुतारी हाती

लोकसभा निवडणुकीवेळी रमेश थोरात यांनी अजितदादांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मात्र महायुतीमुळे थोरात यांना उमेदवारी मिळणे अशक्य असल्याने त्यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले होते त्यामुळे यावेळी थोरात यांना त्याचा फायदा होईल असे म्हटले जात होते. मात्र आमदार राहुल कुल यांच्यासोबत असणारा मुस्लिम आणि दलित मतदार भाजप चे चिन्ह असूनही कुल यांच्यासोबत कायम राहिला आणि या निवडणुकीतही थोरात यांचा पराभव झाला.

रमेश थोरात हे अजितदादांच्या खास मर्जीतले – तसे रमेश थोरात हे अजित पवारांच्या खास मर्जीतील व्यक्ती असून या अगोदर अजित पवार यांनी रमेश थोरात यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सलग दोनवेळा चेअरमनपद देऊन मोठी ताकद दिली आहे. अजितदादा हे सत्तेत आहेत त्यामुळे याचा फायदा निश्चित रमेश थोरात यांना होणार असून आगामी काळात येऊ घातलेल्या ज़िल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत महायुती दौंड तालुक्यात काय निर्णय घेते यावर बरेच काही अवलंबून आहे.