दौंड : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दौंड साठी कोणाला उमेदवारी देणार हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. दोन आप्पा पैकी कोणत्या आप्पाला तुतारी मिळणार याचीच सर्वांना उत्सुकता होती. अखेर माजी आमदार रमेश थोरात यांनी बाजी मारत तुतारी हे चिन्ह मिळवले. पक्षाचे सर्वेसर्वा नामदार शरद पवार यांनी रमेश थोरात यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने पक्षाचे एकनिष्ठ इच्छुक उमेदवार आप्पासाहेब पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे व निवडणुकीदरम्यान आपली काय भूमिका राहील ही आम्ही नंतर स्पष्ट करू अशी प्रतिक्रिया त्यांनी या घडामोडीवर दिली आहे.
आज दि.28 ऑक्टोबर रोजी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रमेश थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचाराच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभा घेण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी सोहेल खान, शहराध्यक्ष सचिन गायकवाड तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाराज इच्छुक उमेदवार आप्पासाहेब पवार हे सभेपासून दूरच राहिले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून आमदार राहुल कुल यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. कुल यांनी तालुक्याचा विकास केला नाही, पोलीसांचा वापर करून विरोधकांवर गुन्हे दाखल केले असा आरोप यावेळी त्यांनी केला. कुल यांची तालुक्यातील हुकूमशाही थांबविण्यासाठी रमेश थोरात यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी वक्त्यांकडून करण्यात आले.
रमेश थोरात म्हणाले की, पक्ष देईल त्याचे आम्ही काम करू आणि साहेब आपला निर्णय सर्वांना मान्य राहील अशी ग्वाही माझ्यासहित सर्व इच्छुकांनी पवार साहेबांना दिली होती आणि पवार साहेबांनी माझ्यासारख्या पन्नास वर्ष राजकारणात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा संधी देऊन तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी जिल्हा बँक चाळीस वर्षे चालवीत आहे, पाच वर्ष आमदारकी केली. जिल्हा बँक देशात आणि आशिया खंडात नंबर एकला गेलेली आहे.
आपल्याकडे आमदारकी असताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे काम केले, शहरातील भुयारी गटाराच्या कामासाठी तब्बल 25 कोटी रुपये आणले. तसेच अनेक कामे केली मात्र एवढ्यावर थांबून चालणार नाही. जनतेचे अनेक प्रश्न आहेत. जो कोणी आमदार असेल त्या आमदाराने, कुठलाही तुटका, फुटका माणूस त्याकडे आला तर त्या माणसाचा आदर करून त्याला भेटले पाहिजे. त्याच्याशी बोलले पाहिजे त्याचे होणारे काम कुठल्याही परिस्थितीत झाले पाहिजे ही लोकांची फार मोठी अपेक्षा आहे. परंतु तुम्ही आम्हाला खुर्चीवर बसविले की आमच्या डोक्यात हवा घुसते आणि ती हवा घुसली की आम्ही तुमच्याकडे बघतच नाही. मग तुमची कामे कशी होणार? लोकांना खेळवत न बसविता, गटतट, जातपात बाजूला ठेवले पाहिजे असे त्यांनी सांगत, राम कृष्ण हरी.. वाजवा तुतारी अशी घोषणा देवून आपले भाषण संपविले.