दौंड पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी, मुस्लिम बांधवांसाठी केले इफ्तार पार्टीचे आयोजन

दौंड : रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून दौंड पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. पुणे जिल्हा ग्रामीण चे पो.अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सदरचा उपक्रम राबविला. यावेळी बहुसंख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते.

इफ्तार पार्टीमध्ये मुस्लिम बांधवांनी खजूर, फळे व शीतपेयांचा आस्वाद घेतला.
मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे म्हणाले की, दौंड शहरातील परंपरेप्रमाणे येथील सर्व समाजाचे सण-उत्सव येथील सर्वधर्मीय एकत्र येत साजरे करतात. त्याचप्रमाणे रमजान ईद सुद्धा सर्वांनी एकत्र येत आनंदात व शांततेत साजरी करावी. कोणताच धर्म भांडणे करावयाची शिकवण देत नाही, सर्वांशी चांगले व बंधुभावाने वागण्याचाच संदेश सर्वच समाजामध्ये दिला गेला आहे. त्याचे आचरण सर्वांनीच केले पाहिजे.

पवित्र रमजान बाबत बोलताना ते म्हणाले की, रमजानमध्ये फक्त उपाशी राहून जमणार नाही तर आपल्या मनातील वाईट प्रवृत्तीला बाहेर काढणे व आपापसातील मतभेद बाजूला काढून टाकणे हा या पवित्र महिन्याचा उद्देश आहे. दौंड मध्ये सर्वच भाई चाऱ्याने राहतात हे आपण नुकत्याच पार पडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवामध्ये अनुभवले आहे. जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना काय करायचे करू द्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत सर्वांनी प्रेमाने एकत्र राहणे जरुरीचे आहे. प्रत्येक माणूस पुण्य मिळावे याकरिता झटत असतो, त्यामुळे रमजान मध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करून त्यांना सेवा दिल्याचे पुण्य आम्हालाही मिळावे या उद्देशाने सदरचा उपक्रम आम्ही राबविला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की भविष्यकाळातही आपण सर्वांनी बंधुभावाने रहावे असेही घुगे म्हणाले.

मुस्लिम समाजाच्या वतीने शाही अलमगीर मशिदीचे विश्वस्त युसुफ इनामदार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक विनोद घुगे व उपस्थित मुस्लिम पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. मा.नगराध्यक्ष बादशहा शेख, सोहेल खान, इस्माईल शेख, शहानवाज पठाण, वसीम शेख, मतीन शेख, शफीक मुलानी, अकबर शेख, कुमेल कुरेशी, फारुख कुरेशी, तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी रविंद्र कांबळे, मा. नगरसेवक फिलीप अंथोनी व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.