प्रा.राम शिंदे यांच्याकडे विधानपरिषद चे सभापती पद

नागपूर – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत – जामखेड येथील मतदार संघातून निसटता पराभव झालेल्या राम शिंदे यांना आता विधान परिषदेचे सभापती पद देऊन भाजप- महायुतिकडून त्यांचे पुनर्वसन करण्यात आल्याचे दिसत आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशी विधानपरिषद सभापतीची निवड केली जाणार आहे. भाजपाचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी भाजपानं माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी विधानपरिषदेत आज निवडणूक होणार आहे.

सभापती पदी निवड निश्चित – महायुतीकडं असलेलं संख्याबळ आणि विधानपरिषदेसाठी एकच अर्ज आला असल्यानं राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीसाठीची निवड निश्चित मानली जात आहे. राम शिंदे हे 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर त्यांना भाजपने मंत्रिमंडळात मंत्रिपदाची संधी दिली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधानपरिषदेचे सदस्यत्व देण्यात आले होते. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला.

राम शिंदे आज सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.