दौंड : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा तसेच स्वामी विवेकानंद जयंती आणि मराठा दिनदर्शिका २०२३ चा प्रकाशन सोहळा असा तिहेरी कार्यक्रम दौंडमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या युगपुरुषांना घडविणाऱ्या, स्वराज्याचे आद्य स्फूर्ती केंद्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा आणि स्वामी विवेकानंद जयंती तसेच मराठा दिनदर्शिका २०२३ चा प्रकाशन समारंभ मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक दौंड येथे उल्लासात पार पडला. यावेळी समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ.कांचनताई कुल, सौ.शितलताई कटारिया, सौ.वैशालीताई नागवडे, सौ मंदाकिनीताई चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. सुरेखा भोसले, सौ स्वाती गिरमकर, सौ अनिता दळवी, सौ आकांक्षा काळे, सौ मीरा वीर, ॲड. अरुणा डहाळे यावेळी विचारमंचावर उपस्थित होत्या.
विपरीत परिस्थितीवर मात करून आपले कुटुंब सावरणाऱ्या आपल्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण, चांगले संस्कार देणाऱ्या इंदुताई रुपनवर, सारिका कुलकर्णी, शशिकला मखरे, सीमा मचाले, फुलाबाई मोहरकर, शोभा शिंदे,आशा मोटे, मंगल फरड, कांचन गोसावी, सुभद्रा दुधाट, सुमन काळे,सिमा शिदगणे स्वामी तसेच मराठा महासंघाच्या मार्गदर्शिका प्रा.अरुणा मोरे यांची इतिहास परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्रावणी मगर व शरयु मेरगळ या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.राधिका काटे व संपदा दुधाट यांनी केले. प्रास्ताविक सौ. सविता भोर यांनी केले तर आभार रोहिणी जगताप यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राणी जांभले, सीमा दिवेकर, लीला कवडे,अदिती थोरात, मीना जाधव, पूजा वीर, यांनी विशेष परिश्रम घेतले.