केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथील कट्टर शिवसैनिक आणि कायम सामाजिक कार्यात अग्रेसर राहून आपला सहभाग नोंदवणारे राजेंद्र रामचंद्र शेळके (वय ५२, अवचटमळा, चव्हाणवस्ती केडगाव ता.दौंड) यांनी सोमवार दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते राजाभाऊ या नावाने केडगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.
उद्यापासून केडगावच्या यात्रेला सुरुवात होत असून ऐन यात्रेच्या धामधूमीत ही दुःखद घटना घडल्याने केडगाव वर दुःखाचे सावट पसरले आहे. राजेंद्र शेळके यांचा मोठा मित्र परिवार असून त्यांच्या अकाली एक्झिटने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राजेंद्र शेळके हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी होते तसेच शिवसेनेचे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी दौंड तालुक्यात शिवसेना वाढीसाठी बरेच परिश्रम घेतले होते. त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. त्यांच्या भावाने त्यांच्या मृत्यूची खबर यवत पोलिसांना दिली असून याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.