| सहकारनामा |
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व असे यश ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी (Tmc) पार्टीला मिळाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा देताना आपलं मत व्यक्त केलं आहे.
यात राज ठाकरे यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींच अत्यंत मनापासून अभिनंदन करत असल्याचं म्हटलंय.
तसेच संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि ह्या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत अशी स्तुती त्यांनी करताना कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, ह्या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्यांच्यात खूपच समानता आहे आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता ह्याचं महत्व तुम्ही नक्कीच समजू शकता असं म्हटलंय.
शेवटी त्यांनी राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो असे म्हणत तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करत असल्याचं त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.






