Rain in Pune : पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहा कार ! अनेक ठिकाणी नदी, नाल्यांना पूर. सदनिका, पोलीस चौक्यांमध्येही पाणी शिरले, दौंड तालुक्यातील रस्तेही गेले वाहून

पुणे : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

पुणे शहर आणि जिल्ह्यास काल दुपारपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या जोरदार पावसामुळे अनेक गावे, सदनिका, घरांमध्ये पाणी शिरले आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवर आल्याने अनेक ठिकाणी वाहतूकही ठप्प झाली आहे. पुणे शहरातही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरले असून  चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरून आतील कंट्रोल रूममधील टेबलही पाण्यात अर्धे बुडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असाच मुसळधार पाऊस विविध तालुक्यांत झाला असून दौंड तालुक्यातील केडगाव, पारगाव रस्ता पाण्यात वाहून गेला, तर नदी, नाल्यांनाही मोठा पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 

पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवण जवळही रस्त्यावर पाणी आल्याने काही तास वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने आपले रौद्ररूप दाखवल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत झाल्याचे दिसत आहेत.

असाच मुसळधार पाऊस आणखी दोन दिवस पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन परतीचा पाऊस  आणखी तीव्र झाला आहे.  त्यामुळे पुणे, मुंबईसह  अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने झोडपले आहे. आज 15 ऑक्टोबर रोजीही राज्यात मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे.