|सहकारनामा|
मुंबई : राज्यातील खाजगी रुग्णालयांचे कोरोना उपचाराचे दर निश्चित करण्यात आले असून आमदार राहुल कुल (Rahul kool) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आल्याचे पाहायला मिळत आहे. उशिरा का होईना पण रुग्णांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतल्याचे मत आमदार राहुल कुल यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागातील रुग्णालयाचे कोरोना रुग्णांचे उपचाराचे दर सगळीकडे सारखेच असून हे दर वेग वेगळे असावेत, अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपस्थितीत कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झालेल्या बैठकामध्ये वारंवार केली होती त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री यांनी नुकताच निर्णय जाहीर केला असून रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे.
यापूर्वी सर्व ठिकाणी व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण साठी ९०००, केवळ आयसीयू व विलगीकरण ७५००, वॉर्डमधील नियमित विलगीकरण (प्रती दिवस) ४००० असा दर आकाराला जात होता, यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांना यांचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये बदल करून दर शहरांच्या वर्गीकरणानुसार आकारण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच घेतला असून दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.
वॉर्डमधील नियमित विलगीकरण (प्रती दिवस) अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये . यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत. व्हेंटीलेटरसह आयसीयू व विलगीकरण अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये तर केवळ आयसीयू व विलगीकरण अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये अशा प्रकारे दर आकारला जाणार आहे.
सरकारने उशिरा का होईना मागणीची दाखल घेतल्याबद्दल आमदार राहुल कुल यांनी सरकारचे आभार मानले असून, याच प्रमाणे सर्व खाजगी रुग्णालयांतील वाढीव बिलांचे ऑडिट करावे गैरप्रकारांना आळा घालावा, अनेक खाजगी रुग्णालयांद्वारे होणारी लूट थांबवून कोरोनाने आधीच होरपळलेल्या सामान्यांना दिलासा द्यावा, कोविड उपचारांसाठी शहरांच्या वर्गीकरण करण्याच्या निर्णयाबरोबरच इतर हि समस्यांवर शासनाने योग्य कार्यवाही करावी अशी विनंती देखील शासनास आमदार कुल यांनी यावेळी केली आहे.