सुधीर गोखले
सांगली : सध्या जिल्ह्यात पाण्याच्या मागणीवरून रणकंदन माजले आहे. तासगाव कवठेमंहाकाळ तालुक्याच्या आमदार आणि आर. आर. आबांच्या पत्नी श्रीमती सुमनताई पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र रोहित पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. तासगाव तालुक्यातील आठ आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नऊ अशा एकूण १७ गावांचा ‘टेम्भू’ च्या विस्तारित योजनेत समावेश करावा या मागणीसाठी ‘करो या मरो’ या पद्धतीने हे आमरण उपोषण सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये आता माघार नाही अशा निर्णायक लढ्याला त्यांनी सुरुवात केली आहे.
आमदार सुमनताई पाटील यांच्या उपोषणस्थळी सत्ताधारी भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या अमरण उपोषणावरून खासदार संजय पाटील यांनी टीका केली आहे तर आंदोलनस्थळी काँग्रेस पक्षाचे नेते विशाल पाटील यांच्यासह अनेक संघटनांनी या उपोषनाला पाठिंबा देऊ केला आहे.
अंगात ताप असूनही स्व. आर.आर आबा यांचे चिरंजीव रोहित पाटील आपल्या मातोश्रींसह या उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती ढासळत असली तरी ते या आंदोलनावर ठाम आहेत. आमचे पाण्यासाठी राजकारण नसून स्वर्गीय आर.आर आबांची इच्छा होती कि पाण्याचे सदैव दुर्भीक्ष राहिलेले सावळज गावासह अन्य १७ गावांमध्ये ‘टेम्भू’ ने प्रवेश करावा शेतकऱ्यांचे शिवार हिरवेगार व्हावे अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली आहे.
स्व.आबा यांच्यानंतर आमदार सुमनताई यांनी वरील मागणीसाठी वेळोवेळी शासनदरबारी पत्रव्यवहार केले आहेत त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. खासदारांनी जिल्ह्याच्या विकासाकडे कोणत्या ‘अँगल’ ने लक्ष दिले? हे एकदा त्यांनी सांगावे. गेल्या नऊ वर्षात जिल्ह्यात विकासाची अशी किती कामे झाली? त्यांनी स्पष्ट करावे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ‘टेम्भू’ ला जोपर्यंत प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असे वक्तव्य आमदार श्रीमती सुमनाताई पाटील यांनी केले आहे.
सरकारने आमच्या समाधानासाठी नुसती घोषणा करून जनतेची फसवणूक करणे थांबवावे आणि तात्काळ कामाला सुरुवात करावी असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले आहे. उपोषणस्थळी त्यांच्या कन्या स्मिता पाटील, काँग्रेस च्या जेष्ठ नेत्या माजी मुख्यमंत्री डॉ.वसंतदादा पाटील यांच्या स्नुषा शैलजा पाटील, वसंतदादा सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील याच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते आंदोलन स्थळी आमदार सुमन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.