Pune – रस्त्यावर मृतदेह टाकून फरार झालेल्या चौघांना पोलिसांनी केले जेरबंद



लोणीकाळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

पुण्यातील मगरपट्टा परिसरात असणाऱ्या लोहिया उद्याना शेजारी शुक्रवारी दि. ०१ जानेवारी रोजी सकाळी पादचारी मार्गावर संशयास्पद आढळलेल्या मृतदेहाचा छडा लोणी काळभोर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत लावला आहे.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी

नारायण शंकर व्यास (वय – ३०,रा. साठेवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली ), जितेश तुकाराम कदम (वय – ३१ रा. माळवाडी, साडेसतरानळी मारुती मंदिराशेजारी, हडपसर) संतोष सुंदर पुजारी (वय – ३५ रा.जनवाडी जनता वसाहत दिनराज मित्र मंडळ शेजारी  गोखलेनगर) संपत मारुती कळंत्रे (वय-४१ रा. मच्छी मार्केट मंडई, हडपसर असे या चार आरोपींना अटक केलेली आहे. तर संतोष नाव व पत्ता माहिती नाही असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण व्यास यांचा केटर्सचा व्यवसाय आहे. त्यामुळे गुरुवारी (३१ डिसें ) लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामदारा परिसरातील साठे वस्ती येथे जेवणाचा कार्यक्रम असल्याने संतोष, बापू, संतोष पुजारी पूर्ण नाव माहिती नाही हे सर्वजण या कार्यक्रमात काम करत होते. कार्यक्रम झाल्यानंतर गुरुवारी (ता.३१ ) रोजी संध्याकाळी मयत व इतर दोघे झोपले होते. मात्र शुक्रवारी (ता.१ ) रोजी सकाळी संतोष हा झोपेतुन उठला नाही. 

यावेळी जितेश कदम, नारायण व्यास, संतोष पुजारी व बापू या चौघांनी मयत संतोष यास उचलून त्यांच्याजवळ असलेल्या पीकअप या चारचाकी गाडीमध्ये टाकून रामदरा रोड साठेवस्ती येथून मगरपट्टा चौकातील लोहिया गार्डन  येथील एका सेवा रस्त्याच्या कडेला ठेऊन ते निघून गेले.

दरम्यान हा प्रकार नागरिकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अधिक तपास केला असता मृत व्यक्ती ही लोणी काळभोर येथील नारायण केटरर्स यांच्याकडे वाढप्याचे काम करीत असल्याचे समोर आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. रणवरे करीत आहेत.