पुणे : सहकारनामा ऑनलाईन
आज दि.18 सप्टेंबर रोजी पुणे विधानभवन सभागृहात पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरातील कोरोना परिस्थितीचा व उपाययोजनांचा आढावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी त्यांनी ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी तसंच ‘कोरोना’बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘कोरोना’च्या संकट काळात रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू रहावा, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. ‘कोरोना’बाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत उपाययोजना राबवण्याचे निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनानं ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम सुरू केली आहे. ‘कोरोना’ला हरवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांचा या मोहिमेतील सहभाग महत्त्वाचा आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असून मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे लवकर निदान होऊन रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रशासनानं अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावं. कोरोना उपाययोजनांची प्रत्येक माहिती लोकप्रतिनिधींसह रुग्ण व सर्वसामान्यांना मिळण्यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये अद्ययावत नोंदी करण्याबरोबरच बेड उपलब्ध करुन देण्याचे नियोजन जबाबदारीपूर्वक करावे, अशा महत्वाच्या सूचनाहि यावेळी त्यांनी दिल्या.