Pune – एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचे पुण्यकार्य करण्यासाठी रक्तदान करा – राज्यमंत्री अब्दुल सत्तार



 

पुणे : सहकारनामा

रक्तदान करणे हे एक मोठे काम असून यामुळे एखादया दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो. रक्तदान करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पुण्यात केले.

पुण्यातील कोंढवा येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन श्री.सत्तार यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार चेतन तुपे,माजी आमदार महादेव बाबर, कारी मोहम्मद इदरीस,माजी स्थायी समिती सदस्य रसिद शेख, अलाहद इब्राहिम भाई, उस्मान तांबोळी, नदीम मुजावर, नगरसेवक  गफूर पठाण, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कोरोनाच्या महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आल्याने  मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केलेले असून रक्तदान करणे हे एक मोठे काम आहे. सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. अशा रुग्णालयांवरही आपण सर्वांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे. राज्यातील गोर गरिबांना मदत करणे महत्वाचे आहे. या शिबिराच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्वांना व रक्तदात्यांना मी मनापासून  शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले.

  यावेळी लॉकडाऊन कालावधीत ज्यांनी चांगले काम केले त्यांचा सन्मानही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. 

  आमदार चेतन तुपे म्हणाले, कोरोनामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आला आहे. मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून या ठिकाणी रक्तदान शिबीराच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. हे फार महत्त्वाचे असून यामुळे एखाद्या व्यक्तीला रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचू शकतो. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहभाग घेताला अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो.

 यावेळी माजी आमदार महादेव बाबर, अलाहद इमब्राहिम भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारी मोहम्मद इदरीस यांनी केले तर सुत्रसंचालन सोयब अन्सारी यांनी केले. यावेळी रक्तदाते, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.