पुणे : रोजंदारीवर काम करणाऱ्या दोन महिलांचे दागिने लुटल्याची घटना आज पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ घडली आहे. हातावर पोट असणाऱ्या महिलासुद्धा आता चोरट्यांच्या तावडीतून सुटत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दोन महिला कामाच्या आशेने कात्रज येथील मजूर अड्ड्यावर उभ्या असताना त्यांना कामाच्या बहाण्याने रिक्षातून जुन्या कात्रज बाेगद्या पलीकडे घेऊन जात याच रिक्षातील चार इसमांनी या महिलांजवळील सोन्याचे दागिने, मणीमंगळसुत्र आणि रोख रक्कम असा सुमारे ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी गोकुळनगर (कात्रज, पुणे) येथील एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार फिर्यादी व अन्य एक महिला कामाच्या शोधात कात्रज चौकातील मजूर अड्ड्यावर उभ्या होत्या. तेथे एका इसमाने येऊन खेड शिवापूर येथे बांधकामावर माल देण्यासाठी दोन महिला पाहिजे असे त्यांना सांगितले. कामासाठी या महिला तयार झाल्यानंतर त्या इसमाने आपल्या सोबत आणखी तीन कामगार असल्याचे सांगत सर्वांना एका सहा सीटर रिक्षातून जुन्या कात्रज बोगद्याच्या पलीकडे नेले.
यानंतर त्यांनी वाटेत गाडी थांबून सर्वांना खाली उतरविले. यावेळी मजूर महिलांना त्यांनी डोंगराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर नेत फिर्यादी यांचा गळ्याभोवती बांधलेला रुमाल मागितला आणि रुमाल काढल्यानंतर या चौघांनी दोघींच्या जवळ असलेले आठ हजार रुपये, गळ्यातील मंगळसुत्र, चमकी, कर्णफुले असा ७६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. या घटनेमुळे महिला खूपच घबरल्या होत्या. याबाबत आता त्यांनी सविस्तर फिर्याद दिली असून या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रसाळ हे करीत आहेत.