पुणे : पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय ड्रग्जप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला असून यामध्ये अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर, अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ.देवकाते व इतर अधिकारी दोषी आढळले आहेत. त्यामुळे डॉ.ठाकूर यांना पदमुक्त तर डॉ.देवकाते यांचे निलंबन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयात उपाचारासाठी दाखल असलेल्या ड्रग्ज माफीया ललित पाटीलचे ड्रग्ज प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले आहे. ललित पाटील याच्या ड्रग्ज प्रकरणात मोठी गुंतागुंत होती. या प्रकरणी एक चौकशी समिती बनविण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल आता समोर आला आहे. या चौकशी समितीने ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर आणि आर्थोपेडीक सर्जन डॉ. प्रविण देवकाते यांच्यावर ठपका ठेवत त्यांना दोषी धरले असून या दोघांवरही कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणे पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ललित पाटील प्रकरणात ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर आणि आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी समितीला दोषी आढळले असल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. या चौकशी अहवालानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांची विभागीय चौकशी करण्याचे आणि त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. डॉक्टर प्रवीण देवकाते यांचेही निलंबन करण्यात आले आहे.
डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते यांच्या मार्गदर्शनाखाली ललित पाटील याच्यावर उपचार सुरु होते. ज्यावेळी ललित पाटील उपचार सुरु असताना फरार झाला त्यानंतर खरा खेळ सर्वांच्या लक्षात आला. ललित पाटील फरार झाल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या चौकशीमध्ये डॉक्टर संजीव ठाकूर आणि डॉक्टर प्रवीण देवकाते हे दोषी आढळले. त्यामुळे त्यांच्यावर वरील कारवाई करण्यात आली आहे.