अख्तर काझी
दौंड : दौंड शहर एक चांगले शहर आहे ते वाईट असल्यासारखे भासवू नका आणि राहिला येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, कोणतीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येथील पोलीस प्रशासन सक्षम आहे असे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले.
गोयल यांनी नुकताच पुणे जिल्हा ग्रामीण,पो. अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला ते भेट देत आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी दौंड पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस व येथील पोलीस निरीक्षक पदाचा नव्याने पदभार स्वीकारलेले भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.
दौंड शहरातील पोलीस वसाहतीची झालेली दुरवस्था, पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारींचे वाढत चाललेले प्रमाण, दौंड- गोपाळवाडी रोड परिसरातील वाढती गुन्हेगारी, शाळा कॉलेज परिसरात मुलींना होत असलेली छेडछाड, भरोसा सेल सुरू करणे आदी विषयांची माहिती पत्रकारांनी गोयल यांना दिली.
गोयल म्हणाले की, दौंड शहरात विविध समाज चांगल्या पद्धतीने राहत आहेत. शहर तसे शांत आहे. शहरात हाणामारी, मोर्चे ,आंदोलन करणे यासारख्या घटना होत असतात. त्यामुळे संपूर्ण शहरच वाईट आहे असे नाही. परंतु अशी परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण आम्हाला मिळालेले आहे जेणेकरून त्यावर नियंत्रण मिळवून शहरातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आणि सज्ज आहोत.
गुन्हेगारांना पाठीशी न घालता पोलीस निश्चित चांगले काम करतील. पत्रकारांनी सुचविलेल्या विषयांवर नक्कीच काम करू. शहरातील एखाद्या घटनेमध्ये कोणा अधिकाऱ्याकडून न्याय मिळत नाही असे निदर्शनास आल्यास थेट माझ्याशी संपर्क करून घटनेची माहिती पत्रकारांनी द्यावी असेही गोयल म्हणाले.
गोयल पुढे म्हणाले की, पोलिसांचे कामच असे आहे की,पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांपैकी एक गट पोलिसांवर नाराज झालेला असतो. काही प्रकरण अगदी सरळ असतात पण काही प्रकरणे थोडीशी क्लिष्ट असतात. प्रत्येकाला वाटते की चूक समोरच्याचीच आहे त्यात पोलिसांनी एकावर कारवाई केली की दुसरा गट नाराज होतो.
दौंड शहरात जी हाणामारीची घटना घडली आहे त्याचा पोलिसांवर कोणताही तणाव किंवा दबाव नाही. कारण पोलिसांचे ते कामच आहे. आणि या प्रकरणामुळे येथील पोलीस निरीक्षकांची बदली झाली नसून तो प्रशासकीय कामाचा भाग आहे. असे गोयल म्हणाले.