| सहकारनामा |
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आज पुण्यात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसंच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य शासन व प्रशासनाच्या वतीनं आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून यादृष्टीनं जिल्ह्यात उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. लहान बालकं बाधित झाल्यास आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येत आहे.
याद्वारे लहान मुलांवरील उपचार मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक औषधे, आवश्यक साधनसामग्री व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याबाबत तयारी करण्यात येत आहे. ससून रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, नायडू रुग्णालय या रुग्णालयांसह जिल्ह्यातील भारती हॉस्पिटल, सिम्बायोसिस हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अशा खाजगी रुग्णालयांनी देखील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.
म्युकर मायकोसिस रोगाचा प्रादुर्भाव कोरोना रूग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांचा पुरवठा रुग्णालयांना सुरळीत होण्यासाठी तसंच यात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी या औषधांचा पुरवठा देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात ४४ ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत. यापैकी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं प्रत्येकी २ असे एकूण ४ ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू झाले आहेत.
अन्य ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीनं ४५ वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील. असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
रुग्ण संख्येबाबत त्यांनी बोलताना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात या आठवड्यात रुग्ण दर कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, ग्रामीण भागात अद्याप संसर्ग वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील निर्बंध १ जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन केले.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवावे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता, रेमडेसिवीर इंजेक्शन तसंच म्युकर मायकोसिस आजारावरील औषधसाठा, लहान बालकांसाठी आवश्यक औषध साठा, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा अशा सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत.