pune collector help – पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख दौंड मधील रिक्षाचालकांच्या मदतीला



|सहकारनामा|

दौंड  : शहर प्रतिनिधी

पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतल्यामुळे दौंड तालुक्यातील वंचित राहिलेल्या परवानाधारक रिक्षाचालकांना राज्य शासनाचे दिड हजार रूपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 

कोरोना व लाॅकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांसाठी दिड हजारांची आर्थिक मदत (अनुदान) घोषित केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे व हि मदत बॅक खात्यावर जमा होण्यासाठी रिक्षाचालकांचे आधार नंबरला मोबाईल नंबर संलग्न असणे, व इतर त्रुटी नसणे बंधनकारक आहे. मात्र, दौंडमधील बहुतांश रिक्षाचालकांचे आधार हे मोबाईल नंबरला संलग्न नव्हते. आणि दौंडमध्ये आधार सेंटर उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश रिक्षाचालक या लाभापासून वंचित राहिले होते. रिक्षाचालकांसाठी दौंडमध्ये आधार शिबीर घ्यावे अशी लेखी मागणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती येथील सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी ४/६/२०२१ ला दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, त्यानंतर दिड महिना हा प्रश्न सुटला नाही. यासंदर्भात जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी तत्काळ दखल घेत सोमवार (दि.२६) रिक्षाचालकांसाठी आधार शिबीराचे आयोजन करण्याबाबत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना लेखी आदेश केले. त्याचा अहवाल सादर करण्याची सुचनाही केली. 

या आदेशानंतर त्याच दिवशी तहसीलदार संजय पाटील यांनी दौंड येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात आधार शिबीराची व्यवस्था केली. या माध्यमातून साधारण ९० ते ९५ रिक्षाचालकांचे आधार दुरूस्तीचे कामे मार्गी लागला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना दिड हजार रूपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आधार संलग्न व दुरूस्ती करण्याकामी महा ई सेवा केंद्र कुरकुंभ येथील आधार केंद्र चालक योगेश रांधवण व महा ई सेवा केंद्र पारगाव येथील आधार केंद्र चालक विनोद ताकवणे यांचे सहकार्य लाभले. 

याबाबत दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. भीमराव मोरे, सचिव उत्तम लोंढे, उपाध्यक्ष जावेद सय्यद, कार्याध्यक्ष राजेश बोर्डे, खजिनदार बाबासाहेब कोरी, यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांचे आभार मानले.