पुणे : पुण्यातील कार अपघात प्रकरण आता गंभीर वळण घेताना दिसत आहे. दोघांचा जीव घेणाऱ्या या कार अपघातातील आरोपीच्या रक्ताचे सॅम्पल बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. रक्तामध्ये अल्कोहोल सापडू शकते यामुळे हे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती देताना, 19 मे रोजी सकाळी 11 वाजता ससून हॉस्पिटलमध्ये घेतलेले रक्ताचे नमुने हॉस्पिटलच्या डस्टबिनमध्ये टाकण्यात आले आणि दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असे सांगितले आहे. ससून रुग्णालयाचे सीएमओ श्रीहरी हलनोर यांनी तपासादरम्यान, ससूनचे एचओडी फॉरेन्सिक मेडिसिन विभाग अजय तावरे यांच्या सूचनेनुसार हे रक्ताचे नमुने बदलले असल्याचे आम्हाला आढळले आहे असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले आज.
धंगेकर यांच्याकडून संताप व्यक्त
आमदार रवींद्र धंगेकर यांनी या सर्व प्रकारावर संताप व्यक्त केला असून पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता असे त्यांनी म्हटले आहे.
याच ससून मध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती.मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता असे धंगेकर यांनी पुढे म्हणत असो, हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत. जे आता हळू हळू जगा समोर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.