पुणे : माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कानगाव येथे जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दिली आहे.
जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा.. अशी हि राज्यव्यापी यात्रा काढण्यात आली असून शनिवार दिनांक 7/5/2022 रोजी दौंड तालुक्यातील कानगाव येथे विठ्ठल मंदिर सभागृहांमध्ये संध्याकाळी 7 वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी प्रमुख वक्ते आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर असून यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, भाजपा किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या सभेस रयत क्रांती संघटना, भाजपा किसान सेल व कानगाव ग्रामस्थांसह परिसरातील शेतकरी, पदाधिकारी, पुणे जिल्ह्यातील रयत क्रांती संघटनेचे सर्व आजी, माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी माहिती देताना महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. परंतु राज्य सरकार कोणत्याही प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ आरोप-प्रत्यारोप व कारवाई तसेच भ्रष्टाचार यामध्ये गुंग झाले आहे. सुरुवातीची अतिवृष्टी, चक्रीवादळ, दुष्काळ कोरोना महामारी, त्याचप्रमाणे अतिरिक्त उसाचा प्रश्न, खंडित वीज पुरवठा, लोड शेडींग यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. तसेच मराठासमाजाचे शैक्षणिक आरक्षण व ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हा प्रश्न मिटलेला नाही. तसेच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा यामधील भोंगळ कारभार यामुळे विद्यार्थी सुद्धा प्रचंड अडचणीत आहेत.
विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले आहे. कारण पंढरपूर मध्ये वीज कनेक्शन बंद केल्यामुळे एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली व नगर जिल्ह्यामध्ये ऊस कारखान्याला जात नाही म्हणून एका 80 वर्षाच्या वयस्कर शेतकऱ्यांने आत्महत्या केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्याने सुद्धा पुण्यामध्ये आत्महत्या केली.
असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील रयतेचे गंभीर झालेले असतानासुद्धा राज्य सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे या जनतेच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधावे यासाठी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा असे राज्यव्यापी अभियान चालू केले असून शनिवार दिनांक 7/5/2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता कानगाव येथील विठ्ठल मंदिर समोरील सभामंडपामध्ये जाहीर सभा होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.