अख्तर काझी
दौंड : शहरामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रमांनी हा उत्सव साजरा करण्यात येत असताना या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांचे जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आले आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भीम वॉरियर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था, भीमशक्ती प्रतिष्ठान तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने दिनांक 12 एप्रिल रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल व लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांचा जाहीर नागरी सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
जयंतीच्या निमित्ताने आयोजकांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, मतिमंद मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आदि सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.दि. 12 एप्रिल रोजी येथील आंबेडकर चौकामध्ये महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा भीम गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.