औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात दौंडमध्ये सकल हिंदू समाज संघटनेचा निषेध मोर्चा, संबंधितांना त्वरित अटक करण्याची मागणी

दौंड : (अख्तर काझी) दौंड शहरातील दोन युवक आणि एक अल्पवईन अश्या तीन युवकांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेऊन हिंदू समाजाच्या भावना दुखावत शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित निर्माण केल्याने संबंधित युवकांना पोलिसांनी त्वरित अटक करून कडक शासन करावे अशी मागणी सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला आणि समबंधित व्यक्तींना त्वरित अटक करावी अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी दौंड पोलिसांना निवेदनही देण्यात आले.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, शहरात राहणाऱ्या तिघा समाजकंटकांनी दिनांक 16 मार्च रोजी स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर औरंगजेबाचे उदातीकरण करणारे स्टेटस ठेवले, ही घटना हिंदू समाज व समस्त शिव शंभू भक्त कदापि सहन करणार नाही. अशा प्रवृत्तीच्या विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करीत त्यांना अटक करावी. या समाजकंटकांवर कारवाई झाली नाही तर हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

संघटनेच्या वतीने ज्या तिघांची नावे देण्यात आली आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवेदन देतेवेळी निखिल स्वामी, दीपक कांबळे, अजय राऊत, आनंद मुनोत यांसह सकल हिंदू समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.