अनुसुचित जाती,जमाती आरक्षण उप वर्गीकरण निर्णयाविरोधात दौंडमध्ये निषेध मोर्चा

दौंड : सर्वोच्च न्यायालयाने, अनुसूचित जाती जमाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या व क्रीमिलियर संदर्भात दिलेला निर्णय हा असंवैधानिक व सामाजिक फूट पाडणारा असल्याचे म्हणत या निर्णयाचा येथील दलित संघटनांनी शहरातून मोर्चा काढीत निषेध नोंदविला.

दलित संघटनांचे पदाधिकारी अमित सोनवणे, प्रमोद राणेरजपूत, सागर उबाळे, मतीन शेख ,बी. वाय. जगताप, भारत सरोदे, श्रीकांत शिंदे, श्रीकांत थोरात, राजू जाधव ,अनिकेत मिसाळ, सचिन खरात, आनंद पळसे, निखिल स्वामी, राजू त्रिभुवन, व्ही.एल. कदम, फिरोज तांबोळी, तसेच भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संघटनांच्या वतीने तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाद्वारे घेतल्या गेलेल्या मागासवर्गीय विरोधी निर्णयामुळे सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण देशात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या घातक निर्णयासंदर्भात योग्य तोडगा काढण्यासाठी संसदीय विशेष अधिवेशन बोलावून अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दलित तसेच आदिवासी समाजाला अधिक प्रतिनिधित्व मिळावे तसेच या समाजाला संरक्षण मिळावे या मागणी करिता दलित संघटनांच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली आहे, त्या अनुषंगाने येथील दलित संघटनांच्या वतीने आजचे आंदोलन करण्यात आले असल्याचे दलित संघटनांचे पदाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,दौंड (आठवले गट) व बहुजन समाज पार्टीच्या वतीने ही सदरचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.