लाईन बॉक्स बंद विरोधात ऑल इंडिया गार्ड कौन्सिलचे दौंड रेल्वे स्थानकात आंदोलन

अख्तर काझी

दौंड : रेल्वे बोर्डाने लाईन बॉक्स बंद करण्याबाबत आदेश काढलेला आहे. या आदेशा विरोधात ऑल इंडिया गार्ड कौन्सिल, दौंड शाखेच्या वतीने दौंड रेल्वे स्थानकातील गार्ड लॉबी समोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये सुमारे 100 गार्ड (ट्रेन मॅनेजर) यांनी सहभाग घेतला. यावेळी ऑल इंडिया गार्ड कौन्सिलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेव घारड उपस्थित होते.

सदर आदेशाविरोधात संपूर्ण भारतभर आंदोलन चालणार असल्याने त्याची दखल घेऊन लाईन बॉक्स चालू ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाला घ्यावाच लागेल असे महादेव घारड यांनी यावेळी सांगितले. नरसिंह नाडगौडा, के.के. अग्रवाल ,धरमवीर कुमार, एस. के. सिंग यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 38 हजार 500 गार्ड काम करतात. नुकतेच रेल्वे बोर्डाच्या आदेशाने गार्ड लाईन बॉक्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गार्डच्या ड्युटी तसेच प्रवाशांच्या संरक्षणामध्ये सुद्धा परिणाम होणार आहेत. त्यामुळे लाईन बॉक्स बंद करण्याच्या आदेशा विरोधात सदरचे आंदोलन करण्यात आले.

लाईन बॉक्सच्या जागी ट्रॉली बॅग देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ट्रॉली, बॅगमुळे गाडीच्या कामांमध्ये व्यत्यय निर्माण होऊन रेल्वेच्या सुरक्षा संरक्षणालाही धोका होणार आहे. लाईन बॉक्स मधील साहित्य रेल्वे सुरक्षा व यात्री संरक्षणासाठी आवश्यक असून त्यामुळे लाईन बॉक्स चालू ठेवणे बाबतचे पत्र कौन्सिलच्या वतीने रेल्वे बोर्डाला देण्यात आले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी दौंड शाखेचे पदाधिकारी दास जाधव, संजय भंगारे, सुरेश आहेर, विनोद आदलिंगे, नागेश वाघमारे, एम. के. भारती आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.