अख्तर काझी
दौंड : महाराष्ट्रात दंगली घडविण्यासाठी लागणारे शाब्दिक कृत्य तसेच सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंचा दौंड तालुका काँग्रेस कमिटीने निषेध नोंदविला आहे. भिडे यांच्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी ही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने दौंड पोलिसांना निवेदन देण्यात आले असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी हरेश ओझा, तन्मय पवार, प्रकाश सोनवणे, पोपटराव गायकवाड, विठ्ठल शिपलकर, निलेश बगाडे, अतुल थोरात, अतुल जगदाळे, रजाक शेख, संकेत क्षीरसागर आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये जातीय दंगली कशा घडतील याचे काम भिडे यांच्याकडे कोणी सोपवले आहे की काय अशी शंका येत असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. भिडे हे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव करीत आहेत, जातीय द्वेष भावनेतून दंगली भडकविण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय नियंत्रण राहिलेले नाही असे दिसून येत आहे.
अशा व्यक्ती विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कायदेशीर कारवाई करावी अशी समस्त महाराष्ट्र प्रेमींची मागणी आहे. जी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये दंगली घडवत आहे त्या व्यक्तीला राज्य सरकार पाठिंबा देत आहे का? राज्य सरकारला महापुरुषांची अस्मिता आहे का? राज्य सरकार जर त्याला पाठिंबा देत असतील तर त्याचा बोलविता धनी कोण आहे ? जर कोणी बोलविता धनी नसेल तर सरकार कायदेशीर कारवाई करणार कधी असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी देऊ नये, महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्र दोषी असे जाहीर करावे अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे.