प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

दौंड : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा स्वप्नपूर्ती सोहळा व लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना सर्वांसाठी घरे देण्याची संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे. हेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने “प्रधानमंत्री आवास योजना – सर्वांसाठी घरे” हे व्यापक अभियान सुरू केले असून, यातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील दौंड तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा गुरुवार दि. २६ सप्टेंबर २०२४, सकाळी १०.३० वाजता, श्री. सिद्धेश्वर मंगल कार्यालय, पिंपळगाव, ता. दौंड येथे आयोजित करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातील सुमारे ५१ महसुली गावांचा समवेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये असल्याने या गावातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरीद्वारे प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळत आहे. या योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील आतापर्यंत २ प्रकल्प अहवाल मंजूर झाले त्यामध्ये २५०० हुन अधिक लाभार्थ्यांचा समावेश आहे त्यापैकी सुमारे ६०० घरकुलांचे काम झाले असून, डिसेंबर २०२४ पर्यंत उर्वरित सर्व पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेत दौंड तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा, योजनेची अंमलबजावणी गतिमान व्हावी यासाठी तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी शासन दरबारी वेळोवेळी संबधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या असून, पाठपुरवा देखील केला आहे. उर्वरित नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी नवीन प्रक्लप अहवाल मंजूर व्हावा यासाठी देखील आमदार अॅड. राहुल कुल यांचा पाठपुरावा चालू आहे. या मेळाव्याला सर्व लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.