शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची दुरवस्था! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

दौंड : शहरातील बहुतांशी शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना ने- आण करण्यासाठी वाहनांची(बस) सुविधा उपलब्ध केलेली आहे. परंतु काही शाळांच्या बसेसची वाईट अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा व्यवस्थापन गंभीर नसल्याचे चित्र आहे. आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचेही शाळेच्या वाहनांकडे लक्ष नाही अशी परिस्थिती आहे. ज्या वाहनांची दुरवस्था झालेली आहे त्या वाहनांच्या चालक व वाहकाने ही बाब शाळा व्यवस्थापनाला सांगणे गरजेचे असताना दुरवस्था झालेली वाहने अशाच अवस्थेत दामटली जात असताना दिसते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.

शहरातील एका नावाजलेल्या शाळेच्या( इंग्रजी माध्यम) बसची खिडकीची काच अर्धवट फुटलेल्या अवस्थेत आहे, तरीसुद्धा या बस वरील चालक -वाहक या फुटलेल्या काचेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असून अशाच अवस्थेतील बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. अर्धवट फुटलेली खिडकीची काच कधीही निखळून एखाद्या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत होऊ शकते. शाळा व्यवस्थापनाने नियमितपणे आपल्या बसेसची तपासणी करणे गरजेचे झाले आहे आणि पालकांनी सुद्धा जागरूकता दाखवून आपले पाल्य ज्या वाहनातून प्रवास करत आहे त्या वाहनांची पाहणी करणे आवश्यक आहे.

दौंड पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने सुद्धा विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करावी व दुरवस्था झालेली असताना त्या वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची आरटीओ विभागाने तपासणी केलेली आहे का? त्यांना आरटीओ ने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परवानगी दिलेली आहे का? याची माहिती ही वाहतूक विभागातील पोलिसांनी घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.