Political – यवत ग्रामपंचायत (भाजप) कुलगटाकडे, सरपंचपदी समीर दोरगे तर उपसरपंचपदी सुभाष यादव यांची निवड



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये सर्वात जास्त लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायतीपैकी एक असणाऱ्या यवत ग्रामपंचायतीची सत्ता हि राजकीय घडामोडीनंतर  कुल गटाकडे आली आहे. यवतचा विकास आणि त्यासाठी लागणारी ग्रामपंचायतीची साथ यासाठी आमदार राहुलदादा कुल यांनी स्वतः या सरपंच पदाच्या निवडीत वयक्तिक लक्ष घातले होते त्यामुळे यवत ग्रामपंचायत भाजपकडे येण्यास मोठी मदत झाली आहे.

आज यवत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी समीर दोरगे तर उप सरपंचपदी सुभाष यादव यांची निवड झाल्याने कुल गटाने एकच जल्लोष केला आहे. निवडणुकीचा निकाल आला त्यावेळी कुल गट 8 तर थोरात गट 9 असे संख्याबळ होते मात्र सरपंच पदाच्या निवडीवेळी वेळी थोरात गटात दिग्गज मंडळींना डावलली गेल्याची भावना निर्माण झाली होती यातूनच थोरात गटात उभी फूट पडून यवत मधील थोरात गटाचे आधारस्तंभ समीर दोरगे आणि त्यांचे सहकारी इमरान तांबोळी यांनी अंतर्गत कलहाला राम राम ठोकत कुल गटात प्रवेश केला आणि कुल गटाचे संख्याबळ हे 8 वरून 10 तर थोरात गटाचे 9 वरून 7 वर आले. त्यामुळे येथे सहजपणे कुल गटाचा सरपंच, उपसरपंच निवडला गेला आहे.

सध्या यवतमध्ये कुल गटाचे पारडे हे जड झाले असून यवत गावाचा विकास हेच आपले प्रमुख कार्य राहील असे नवनिर्वाचित सरपंचांनी जाहीर केले आहे.