पुणे : सहकारनामा
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. कुणी कोणती कसर कुठे अन कशी काढेल याचा काही नेम नाही.
असाच काहीसा प्रकार हवेली तालुक्यात घडला असून येथे ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात येत असलेल्या प्रचाराचा राग मनात धरुन कोरेगाव मूळ येथील प्रचारात अग्रेसर असणाऱ्या एका कार्यकर्त्याची महिंद्रा कंपनीची थर मॉडेल जीप ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून देण्याचा भयंकर प्रकार घडला आहे.
हा प्रकार गुरुवारी रात्री घडला असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि गाडी मंगेश सुरेश शितोळे ( वय- ३५ , रा.इनामदार वस्ती , कोरेगाव मूळ , ता.हवेली ) याची असून त्यांनी या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत त्यांची महिंद्रा थर जीप ही आगीत पूर्णपणे जळून मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवेली तालुक्यातील कोरेगावमूळ येथे दि.७ जानेवारी रोजी रात्री अज्ञात इसमांनी निवडणुकीत होत असलेल्या प्रचाराचा राग मानत धरून अंधारात गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली आहे. यात ही जीप पूर्णपणे जळली असून या जीपचे अंदाजे ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहेत.