अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी या गावामध्ये मोठी राजकीय खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली असून ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या दोन पॅनल प्रमुखांनी केलेल्या अर्जानंतर एका सदस्याला क्लिनचीट तर दुसऱ्या सदस्याला अपात्र ठरवल्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्री.हर्षल माधव शेळके यांनी दि.11/06/2019 रोजी अनिता संभाजी गोरगल या ग्रामपंचायत सदस्यांचा विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे सरकारी गायरान जमीनीत अतिक्रमण केल्यामुळे त्यांचे पद रद्द करावे असा अर्ज केला होता. याबाबत सर्व माहिती व जाब, जबाब घेऊन जिल्हाधिकारी यांनी सदर अर्जदारांची मागणी फेटाळून लावली त्यामुळे अनिता संभाजी गोरगल यांचे पद आहे तसेच अबाधित राहिले. तर श्री.धनाजी नागुजी शेळके यांनी दि.14/11/2019 रोजी ग्रामपंचायत सदस्य अतुल पोपट आखाडे यांनी सरकारी गायरान जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याने त्यांचे पद बडतर्फ करण्यात यावे अश्या मागणीचा अर्ज जिल्हाधिकारी सो पुणे यांना केला होता. या प्रकरणातही जिल्हाधिकारी सो यांकडून संबंधित जाब, जबाब आणि अर्जसोबत दिलेला पुरावा ग्राह्य धरून अतुल पोपट आखाडे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी ‛अपात्र’ ठरविण्यात आले असल्याचा आदेश देण्यात आल्याने त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे.
धनाजी नागुजी शेळके हे आमदार राहुल कुल गटाचे खंदे समर्थक असून त्यांच्या पत्नी सौ.शोभा धनाजी शेळके या ग्रामपंचायत वाखारी च्या विद्यमान सरपंच आहेत. तर हर्षल माधव शेळके हे माजी आमदार रमेश थोरात गटाचे खंदे समर्थक असून त्यांच्या पत्नी सौ.राणी हर्षल शेळके या विद्यमान जिल्हापरिषद सदस्य आहेत.
हर्षल शेळके यांनी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला असून धनाजी शेळके यांचा अर्ज ग्राह्य धरीत ग्रामपंचायत सदस्याचे पद रद्द झाल्याने हा हर्षल शेळके आणि माजी आमदार रमेश थोरात गटाला मोठा धक्का मानला जात आहे.