दौंड
दौंड शहरातील अवैद्य धंद्याविरोधातील वाढत्या तक्रारींमुळे दौंड पोलिसांनी येथील जुगार अड्ड्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे.दि.16 मे रोजी शहरातील बोरावके नगर व दौंड -पाटस मार्गावरील गिरिम गावच्या हद्दीतील वायरलेस फाटा परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलीस पथकाने छापा मारून तब्बल 17 जणांवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून एकूण 21 हजार रू चा मुद्देमाल( मोबाईल,जुगार साहित्य व रोख रक्कम) जप्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दौंड पोलीस स्टेशनचे सहा. पो. निरीक्षक तुकाराम राठोड यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, दौंड, कुरकुंभ मार्गावरील बोरावके नगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन (मोबाईल द्वारा) जुगार अड्डा चालविला जात आहे. राठोड व पोलीस पथकाने दु.2.30 वा. च्या सुमारास या ठिकाणी छापा मारला असता, दोन इसम ऑनलाइन आकड्यांचा जुगार घेत असल्याचे दिसून आले.
यावेळी या दोघांकडे जुगार खेळणाऱ्या ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 7110 रु.चा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी यश शिवाजी वाल्मिकी, अंकुश अजित चव्हाण, निखिल श्रीकांत रणदिवे, सचिन पवन जाधव, लहू अजित चव्हाण, दासबाबु मलेला, कुणाल देवकाते(सर्व रा. दौंड), राहुल बाळू मदने(रा. गिरिम) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16 मे सायंकाळी 6 वा. सुमारास सहा. पो. निरीक्षक अरविंद गटकुळ व पोलीस पथकाने दौंड पाटस मार्गावरील गिरिम गावच्या हद्दीतील हॉटेल साई पॅलेस शेजारील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता या ठिकाणी जुगारी 52 पत्त्यांचा तिरट नावाचा जुगार पैशावर खेळत असल्याचे मिळाले. पोलिसांनी या जुगाऱ्यांना ताब्यात घेत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 13 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दीपक बाळू जाधव, नारायण काशिनाथ जगताप(रा. बारामती), लाला बबन लोणकर(रा. केडगाव, दौंड), प्रदीप खरचीलाल करचे(रा. भिगवण), हरिश्चंद्र देवचंद भोंडवे(रा. बारामती), योगेश यशवंत खरात(रा. पणदरे, बारामती), अजय दादू सकट(रा.सुपा, बारामती) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली. छाप्या दरम्यान मुन्ना असिफ शेख, दिगंबर वाघमोडे(रा. दौंड) हे पळून गेल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पो. हवा. व्ही. एम. गायकवाड, राऊत,बी. पी. जाधव, गिरमे या पोलीस पथकाने कारवाईत भाग घेतला.