खुटबाव : महाविदयालयीन युवकांनी श्रमप्रतिष्ठा जपणे गरजेचे आहे. केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण घेऊन त्यांनी न थांबता श्रमसंस्कार शिबिरातील शिकवण युवकांनी कायम जपली पाहिजे ” असे प्रतिपादन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार ह्यांनी केले. ते येथील
भैरवनाथ शिक्षण मंडळाच्या पोपटराव किसनराव थोरात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पवार पुढे म्हणाले ,” आज महाविद्यालयाच्या तरुण-तरुणींनी श्रमाची लाज न बाळगता धाडसानं श्रमप्रतिष्ठा जपत आजच्या युगात आई- वडील व गुरुजन ह्यांच्याबद्दल आदर ठेवत ‘मी समाजाचं काही देणं लागतो ‘, ह्या भावनेतून त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली, तर त्यांना आपले ध्येय निश्चितपणे साध्य करता येईल.” अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर हे होते. ह्या प्रसंगी भैरवनाथ शिक्षण मंडळाचे सहसचिव सूर्यकांतकाका खैरे ह्यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रारंभी सा.प्रा.विशाल सुतार ह्यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, तर शेवटी सा.प्रा.अक्षता थोरात ह्यांनी आभारप्रदर्शन केले.सूत्रसंचालन सा.प्रा.डॉ.मल्हारी मसलखांब ह्यांनी केले.ह्या प्रसंगी उपसरपंच अतुल होले , अन्य ग्रामस्थ , तसेच शिबिरार्थी स्वयंसेवक ह्यानीही आपले मनोगत व्यक्त केले.
अशा ह्या मौजे लडकतवाडी येथील ८ ते १४ जानेवारी ह्या कालावधीतील ह्या शिबिरामध्ये मान्यवरांची विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.त्यांचा लाभ घेत शिबिरार्थींनी श्रमदानाबरोबरच १२ जाने.ह्या राष्ट्रीय युवकदिनी रक्तदान शिबिरास प्रतिसाद देत ५३ रक्तदात्यांचे रक्तसंकलन केले. शिबिरकालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच महिलांसाठी हळदी-कुंकू उखाणेस्पर्धा आणि संगीत खुर्ची आदी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ‘ माझी वसुंधरा ‘ आणि ‘ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘ ह्याविषयी प्रबोधन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक सा.प्रा. निखिल होले आणि कार्यक्रम अधिकारी सा. प्रा. विशाल सुतार ह्यांच्या पुढाकाराखाली शिक्षक – शिक्षकेतर , तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी ह्यांनी परिश्रम घेतले. त्यांना लडकतवाडीच्या सरपंच सौ.रागिणीताई जगताप आणि उपसरपंच अतुल होले , तसेच उद्धवअण्णा फुले ह्यांच्यासह सर्व आजी – माजी पदाधिकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.