दौंड : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड चे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी आज कुरकुंभ येथील आई फिरंगाई देवी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले व येथील पोलीस बंदोबस्ताचा, इतर परिस्थितीचा आढावा घेतला. कुरकुंभ येथे आई फिरंगाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. उत्सवा दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून येथील कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत व चोख पोलीस बंदोबस्ता बाबत पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना मोलाच्या सूचना केल्या.
या उत्सवातील गर्दीचा फायदा उठवीत चोरटे दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांच्या किमती ऐवजा वर डल्ला मारतात. उत्सवामध्ये महिलांचा व मुलींचा सहभाग मोठा असल्याने रोडरोमिओ हिरोगिरी दाखवीत त्यांची छेडछाड करतात असा दरवर्षीचा अनुभव आहे. ही सर्व परिस्थिती समजून पो. निरीक्षक गोपाळ पवार यांनी आज खास करून मंदिराला भेट दिली व येथील पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.
मंदिर परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच या ठिकाणी महिलांना छेडछाड होणार नाही व त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाणार नाही याची मोठी दक्षता घेण्यासाठी त्यांनी कुरकुंभ येथील पोलीस चौकीचे सहा. पो. निरीक्षक नागनाथ पाटील व पोलीस वर्गाला सूचना केल्या. उत्सवा दरम्यान मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व भाविकांना त्रास होणार नाही या दृष्टीने पवार यांनी या ठिकाणच्या वाहतुकीचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन आखून दिले.