पुणे-सोलापूर हायवेवर कंटेनर चालकांना लुटणाऱ्या टोळीला पोलीसांनी पकडले

पुणे ग्रामीण : पुणे-सोलापूर हायवेवर कंटेनर चालकांना हत्यारांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील आरोपींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने यवत पोलीसांनी पकडून आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी यवत परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी कंटेनर चालक अजय कुमार बनवारी लाल पाल (वय 26 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर रा. लोरपुर ताजन, ता अगबरपुर जि.आंबेडकर नगर उत्तर प्रदेश) हे आपला कंटेनर पुणे सोलापूर हायवेवरील वाखारी (ता.दौंड) येथे रस्त्याच्या कडेला घेऊन जेवणासाठी हॉटेल साई समोर थांबले असता त्यांना आरोपी 1) लखन रामचंद्र पवार 2) साहील हसन शेख वय 3) महेबुब महम्मद अन्सारी 4) अल्पवयीन विधी संघर्ष बालक, 5) अल्पवयीन विधी संघर्ष बालक (सर्व राहणार सहकारनगर यवत. ता. दौंड जि पुणे) यांनी जवळ येऊन त्यांच्याकडे असणारे चाकु, लोंखडी गज, लाकडी दांडके या हत्यारांचा धाक दाखवून कंटेनर चालकाचा मोबाईल व खिशातील पाकीट ज्यामध्ये 2 हजार रुपये ठेवलेले होते हे सर्व घेऊन फिर्यादीला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथून जात असलेल्या दिगंबर संतोष इनामदार, संजय अर्जुन शेळके, अक्षय बाळासाहेब शेळके (सर्व. रा.वाखारी ता. दौड जि.पुणे) यांनी कंटेनर चालकाला आरोपींच्या ताब्यातून सोडवून आरोपींना पकडून ठेवत पोलिसांना फोन केला. फिर्यादी याचा दुसरा कंटेनर चालक मित्र गजराजसिंग नारायणसिंग (रा.मंढा ता. कोठपुतली जि.जयपुर व मोहमद अरीब दिनमोहमद रा. कैरका ता. नुहम) हेही तेथे आले व त्यांनी सदर मारहाण करणाऱ्या आरोपींना ओळखत वरील आरोपींनी हाॅटेल रोशनी समोर त्यांच्याही कंटेनरची समोरील काच फोडुन त्यांचे मोबाईल हिसकावुन घेवुन गेल्याचे सांगितले. या सर्व प्रकरणात यवत पोलिसांनी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि स्वप्नील लोखंडे यांनी वरील 5 आरोपींवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.